August 9, 2025

मुख्यमंत्र्यांनी संवाद केल्यानंतर एसटी कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचे आंदोलन स्थगित

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा व इतर मागण्यासाठी गेली तीन दिवस कळंब बस आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी कळंब येथील बीएसएनएल टॉवरवर चढून बसले होते.मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. अखेर काल दिनांक २९ जून रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सच्चिदानंद पुरी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद केला व सरकार सर्वसामान्यांचे आहे, तुमची मागणी आम्ही मान्य करू. त्या दृष्टीने कार्यवाही करू तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका व आपले आंदोलन स्थगित करा असे सांगितल्याने व पुरी यांनी आंदोलन स्थगित केले व मोबाईल टॉवर वरून रात्री उशिरा उतरले व उपस्थित पुरी कुटुंबीय, अधिकारी व कर्मचारी यांना वाटणारी काळजी संपली. यानंतर त्यांचे वडील अशोक महाराज पुरी यांनी त्यांना आलिंगन दिले.त्यांना अश्रू अनावर झाले. दिनांक २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता पुरी यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते.मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती. मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता.यामुळे चिंता अधिकच वाढत होती काल दिनांक २९ जून रोजी कळंब सागरातील कर्मचाऱ्यांनी पुरी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले व कळंब बस आगाराच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनात पुरी कुटुंबीय ही सहभागी झाले होते. कळंब बस आगारातील बस सेवा ठप्प झाली होती.यामुळे प्रवाशांना तासान तास अडकून पडावे लागले.सच्चिदानंद पुरी यांनी खाली उतरल्यानंतर संपर्क माध्यमांशी बोलताना सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत उदासीन असून नुसती आश्वासन दिली जात आहेत. महामंडळ कामगार संघटना हा प्रश्न सोडवू शकत नाहीत यामुळे कर्मचारी म्हणून वैयक्तिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांशी संवाद करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे, कळंब तालुका भाजपा अध्यक्ष अजित पिंगळे यांनी सहकार्य केले असल्याचे सांगितले.दरम्यान वरिष्ठ अधिकारी पातळीवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद व्हावा असे प्रयत्न झाले.विधिमंडळात धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित करून सरकारची लक्ष वेधले.
error: Content is protected !!