धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे २०२४ रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यावेळी माहिती देतांना म्हणाले,लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत कुठे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास सी-व्हिजिल अँपच्या माध्यमातून तक्रार करता येते.या तक्रारीची १०० मिनिटात दखल घेतली जाते तसेच १९५० या क्रमांकावर देखील त्याबाबतची माहिती देता येते.मतदारसंघात १२४ पथके राहणार असुन ४० पथके एकाचवेळी कार्यरत राहतील.३८ भरारी पथके असतील.१० हजार मनुष्यबळ निवडणूक कामाकरिता लागणार आहे.सर्व ईव्हीएम मशिनची तपासणी पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेद्वारे १२ एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे,१९ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक, नामनिर्देशन पत्राची छाननी – २० एप्रिल रोजी,उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल, ७ मे रोजी मतदान आणि ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. समाज माध्यमे,पेड न्यूज व फेक न्यूजवर यावर निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.फेक न्यूज पसरविणाऱ्यावर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक काळात सोशल मिडियावर पोस्ट करतांना काळजी घ्यावी लागणार आहे. चुकीचे संदेश पाठवू नये किंवा ते पुढे पाठवू नये.जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले. ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात २३९ – औसा,२४० – उमरगा,२४१- तुळजापूर,२४२- उस्मानाबाद,२४३ – परंडा आणि २४६ बार्शी या विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.यामध्ये एकूण २१३९ मतदान केंद्र आहे.२३ जानेवारी २०२४ नुसार १० लक्ष ५८ हजार १५६ पुरुष,९ लक्ष ४६ हजार ५४ स्त्री आणि ७८ तृतीयपंथी असे एकूण २० लक्ष ४ हजार २८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.बार्शी विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील तर औसा विधानसभा मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यातील असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यांचा समावेश आहे. निवडणूकीच्या काळात अवैध रक्कम,दारु,मादक पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत Election Seisure Management System (ESMS) प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे.पोस्टल बॅलेट मतदान सुविधेसाठी ८५ वर्षावरील नागरिक तसेच दिव्यांगासाठी त्यांच्याकडून फॉर्म नं-२२ डी नमूना बीएलओच्या माध्यमातून भरुन घेण्यात येणार आहे.माध्यमांनी या काळात फेक न्यूज,अफवा पसरवू नये.असे डॉ ओंबासे यावेळी म्हणाले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी