धराशिव (जिमाका) – जिल्हयाला २ राज्यांच्या सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील गरोदर महिला त्याठिकाणी जाऊन अवैध गर्भपात करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्यावर्षी जिल्हा पीसीपीएनडीटी समितीने गुलबर्गा येथे याबाबतची कारवाई केली होती.जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सतर्क असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी केले. डॉ.मुल्ला यांच्या अध्यक्षतेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात ६ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे,जिल्हा शासकीय अभियोकता ॲड.शरद जाधवर, आयएमए अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, वरिष्ठ स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी/सरोदे, माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी व पीसीपिएनडीटी कायदेविषयक सल्लागार ॲड.रेणुका शेटे यांची या बैठकीला उपस्थिती होती. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केस करणे,सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्राची त्रैमासिक तपासणी करणे,विविध बैठकांचे आयोजन करणे,सोनोग्राफी केंद्राचे नूतनीकरण,अशा इतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंगनिवडीस प्रतिबंध, कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सतत सतर्क असून दर दोन महिन्याला पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते.जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहे.जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर बैठका घेऊन पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत.जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन अवैधरीत्या गर्भलिंग निदान अथवा गर्भपात होत असल्यास पीसीपीएनडीटी सेल,जिल्हा रुग्णालय अथवा तालुकास्तरावर त्या कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून माहिती द्यावी अथवा टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ या क्रमांकावर गोपनीय माहिती देण्यात यावी.ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.दिलेली माहिती खरी असल्यास गुन्हा दाखल झाला असता माहिती देणाऱ्यास राज्यस्तरावरून खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन