August 9, 2025

महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

  • कळंब – आर्थिक विकासात प्रगती साधण्यासाठी तसेच जातनिहाय वास्तव समजण्यासाठी बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कळंब तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत हे निवेदन देण्यात आले आहे.
    काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जातनिहाय जनगणना करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मागणी करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणनेचे काम पूर्ण झाले आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा जातिनिहाय जनगणना केल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस प्रणित राज्यात जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. या जनगणनेचा त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच इतर जातींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षणाचा लाभ मिळेल, व कोणत्याच जातींच्या समाजात अन्याय होणार नाही यासाठी जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे.
  • जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे महाराष्ट्रात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी कळंबचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर उमेश शिवाजीराव गुंड सतिश काळे यांच्या सह्या आहेत.
error: Content is protected !!