धाराशिव (जिमाका) — जिल्ह्यातील जलसाठ्यांचे संवर्धन व शेतीस उपयुक्त गाळ पुनर्वापरासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत धरणांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये पसरविला जाणार आहे.गाळामध्ये भरपूर सेंद्रिय घटक असल्यामुळे तो शेतीस उपयुक्त असून,जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होणार आहे. गाळ काढण्याची कामे ग्रामपंचायत व अशासकीय संस्था (NGO) यांच्या माध्यमातून केली जाणार आहेत.ज्या भागांमध्ये अशा संस्था उपलब्ध नाहीत,तेथे ग्रामपंचायतीमार्फत काम करण्यात येईल. शासनामार्फत या संस्थांना किंवा ग्रामपंचायतींना मशीन व इंधन भाडे दिले जाणार आहे. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेतामध्ये नेऊन पसरवावा लागेल. पात्र शेतकऱ्यांना यासाठी अनुदान देखील मिळणार आहे.या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्था व ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे १७ एप्रिल २०२५ पूर्वी सादर करावेत. अशासकीय संस्थांची निवड खालील निकषांवर केली जाणार आहे.संस्था ही धर्मदाय आयुक्त कार्यालय,कंपनी कायदा २०१३ कलम ८, सहकारी सोसायटी कायदा १८६० किंवा सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकृत असावी.मागील तीन वर्षांचे संस्थेचे लेखापरीक्षण झालेले असावे.जिल्हा/तालुका/ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवर माहिती संकलनासाठी सक्षम कर्मचारी असावेत.संस्था सनियंत्रण व मूल्यांकनातील अनुभव असलेली असावी. या सर्व बाबींची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.निवड व काम वाटपाचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडे राहील. योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.श्री पि.के.महामुनी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी, धाराशिव( ८९९९२५९९६२), श्री.एस.एस.जाधव,उपविभागीय जलसंधारण अधिकारी,तुळजापूर (७९७२८५१४००), श्री.बी.ए.ढोण, उपविभागीय जलसंधारण अधिकारी,कळंब-वाशी (९७६५८२७३१९), श्री पी.के.महामुनी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी,परांडा-भूम (८९९९२५९९६२) आणि श्री.ए.के.काळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उमरगा- लोहारा (९८३४८९८१५६) यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमामुळे जलसाठ्यांमधील साठवण क्षमता वाढणार असून,शेतकऱ्यांना उन्नत उत्पादनासाठी उपयुक्त गाळाचा लाभ होणार आहे.त्यामुळे इच्छुक संस्था व ग्रामपंचायतींनी वेळेत प्रस्ताव सादर करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी