धाराशिव (राजेंद्र बारगुले ) – उमरगा येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील विशेष शिक्षिका भावना नान्नजकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भावना नान्नजकर या निवासी मूकबधिर विद्यालय उमरगा येथे 1996 पासून विशेष शिक्षिका पदावर कार्यरत आहेत.मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम त्या सतत राबवित आहेत.कळी नावाचा कवितासंग्रह त्यांनी प्रकाशित केला आहे.कोरोना काळात इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या.याच काळात विविध स्पर्धांमध्ये ऑनलाईन विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांनी नोंदवला.अहमदनगर येथील जानकाबाई आपटे निवासी मूकबधिर विद्यालयमार्फत आयोजित कर्णबधीरांच्या वाचा कौशल्य आणि भाषा कौशल्य या स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांचा हिरीरीने सहभाग नोंदवतात.यामध्ये प्रत्येक वर्षी त्यांना उत्तम यश मिळते.कोरोना काळात दिव्यांगाचे लसीकरण त्यांनी करून घेतले.त्यांच्याच प्रयत्नांनी आज अनेक विद्यार्थी बोलू लागले आहेत.तर महात्मा बसवेश्वर उमरगा येथे पवन बिराजदार,कुमार स्वामी,श्रावणी कुंभार यांना कॉकलेरीन इम्प्लान्ट करून सामान्यांच्या प्रवाहात प्रवेशित केले आहे तर जुलै 2024 मध्ये आणखी दोन विद्यार्थ्यांचे त्यांनी स्वतः प्रयत्न करून कॉकलेरीन इम्प्लान्ट करून घेतले आहे.भविष्यात या विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांसारखे शिक्षण देण्यास त्या तयार करणार आहेत.भविष्यात कॉकलेरीन इम्प्लान्ट झालेल्या मुलांचा वर्ग तयार करणे आणि त्यांना सर्वसामान्यांच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचा त्यांचा मानस आहे. गरुडासारखे उंच गरुडभरारी घेणारे विद्यार्थी तयार व्हावेत असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.विशेष शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय