August 9, 2025

सांजा रोड परिसरातील रस्ते व रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली करण्याची मागणी

  • धाराशिव – शहर विस्तारित असलेल्या सांजा रोड परिसरातील सर्व जोडलेले रस्ते व त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी केली आहे. दरम्यान,या कामाकडे दुर्लक्ष केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा गर्भित इशारा अक्षय भालेराव यांनी दिला आहे.
    दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,सांजा रोड परिसरातील उस्मानपुरा चौक,संत गोरोबा काका नगर, सिद्धार्थ नगर,शिवनेरी नगर, तुळजाई चौक,देवा चौक,लक्ष्मी नगर,विठ्ठल नगर,साईश्रद्धा नगर, छत्रपती शिवाजी नगर,टापरे बिल्डिग आदींसह जोडलेले रस्ता हा या भागांतील मुख्य रस्ता आहे.याच मार्गाने येथील रहिवाशांची मुख्य वाहतूक असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली नसल्यामुळे नागरिकांनी आपले सांड पाणी देखील रस्त्यावरतीच सोडले आहे.त्या घाण पाण्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तर रस्त्यातील खड्यांमुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.यापूर्वी देखील आपल्या कार्यालयास याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेरली आहेत. परंतू अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे याबाबीकडे विशेष लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा यासाठी लवकरच या भागातील नागरिक रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. यावर अक्षय भालेराव, आनंद भालेराव, पुष्पकांत माळाळे, राजाराम बनसोडे, करण वाघमारे, अनवर शेख, समीर शेख, हकीम शेख, फेरोज शेख आदींच्या सह्या आहेत.
error: Content is protected !!