August 9, 2025

प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम

धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम २३ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.शहरी व ग्रामीण भागात अतिजोखमीच्या ठिकाणी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या ९३ पथकाकडून दररोज ४० ते ५० घरांना भेटी देणार आहेत.त्यामध्ये ३८ हजार २२१ कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या मोहिमेचे उद्दिष्ट क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या संशयित क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग निदान करून औषधोपचारावर आणणे हे आहे.या मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन संशयीत क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्सरे तपासणी, NAAT तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत.
क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचे रोग निदान व नवीन आढळलेल्या क्षयरुग्णांना औषध उपचार सर्व आरोग्य संस्थामार्फत मोफत उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यास,आशा कार्यकर्तीस व स्वयंसेवक यांना संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे.

error: Content is protected !!