नाशिक – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे सिटी सेंटर मॉलसमोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले. अमित शहा हाय हाय,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.सिटी सेंटर मॉल चौकार महापालिकेतर्फे संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही प्रतिमा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहे.वंचित बहुजन आघाडीतर्फे महिलांच्या हस्ते या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्याच ठिकाणी अमित शहा विरुद्ध आंदोलन करण्यात आले. आता आंबेडकर,आंबेडकर म्हणण्याची सर्वांची जणू फॅशनच झाली आहे.इतके वेळ त्यांनी देवाचे नामस्मरण केले असते तर त्यांना स्वर्ग प्राप्त झाला असता असे वक्तव्य अमित शहा यांनी केले होते.त्यांच्या या वक्तव्याविरुद्ध देशभर रान उठले असून त्याचाच एक भाग म्हणून नाशकात वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात आले. विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान आणि दैवत आहेत.त्यांच्या विरोधात कुणी बेताल वक्तव्य केले तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही.अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत.महापुरुषांबद्दल बोलताना अशा उच्चपदस्थानी किमान शब्द जपून वापरायला हवे.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करून त्यांनी तमाम आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.त्यांनी त्वरित माफी मागावी,अशी मागणी अविनाश शिंदे यांनी यावेळी केली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात