- करोडो भारतीयांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणणार्या नेत्यांमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोटी-कोटी भारतीयांचे अंधकारमय जीवन लक्ष-लक्ष किरणांनी प्रकाशित केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय राज्यघटनेमुळे आज भारत देश एकात्मिक,अखंड असुन भारत देश एक संघ आहे तसेच राज्यघटनेतील तरतुदीमुळेच भारतात कधीही हुकूमशाही आली नाही.विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांच्या विकासासाठी समान संधी आणि मुलभूत अधिकार देवून देशाला प्रगतीपथावर नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
राज्यघटनेतील मूलभूत हक्क,कर्तव्ये,त्रिस्तरीय पंचायत राज मधून सर्वसामान्यांना सत्तेत सहभागीत्व,वंचितांना संधीची उपलब्धता,राज्य आणि केंद्र यामधील सुयोग्य समन्वय ही राज्यघटनेची उपायुक्तता वाढविणारी आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या कलमांमुळेच देशात शांतता आणि सुरक्षितता आहे,अन्यथा विविध धर्मीय-जातीय-पंथीय मतभिन्नता असलेला देश केंव्हाच सीरिया प्रमाणे अराजक,अफगाणिस्थान प्रमाणे तालिबानी झाला असता.आपल्या देशात अराजकता निर्माण झाल्यास देशात किती भयावह स्थिती निर्माण होईल,याचा विचारही गर्भगिळीत करणारा वाटतो.देशात शांतता,सुरक्षितता आणि अखंडता कायम आहे ती विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच! सामाजिक जीवनात २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा,१९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह,१९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहातून अस्पृश्यांमध्ये स्वसन्मानाची ज्योत जागवली.
प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन करून करोडो बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. १५ ऑगस्ट १९३६ रोजी स्वतंत्र मजुर पक्ष ,१९ जुलै १९४२ रोजी शेड्यूल कास्ट फेडरशन आणि १९५५ ला प्रस्तावित रिपब्लिकन पक्षाद्वारे राजकीय क्षेत्रात पायाभरणी केली.१४ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करताना बाबासाहेबांनी समतावादी,मानवतावादी,विज्ञानवादी बौद्ध धम्म भारतात पुर्नस्थापित करून देशातील संभाव्य धार्मिक यादवी टाळली.
भारतीय अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरणारे अर्थशास्त्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते हे आज आपल्या लक्षात आले पाहिजे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या-स्त्रीयांच्या हक्कासाठी १९५२ साली आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉ.बाबासाहेबच होते,२४ तासापैकी २० -२० तास अध्ययन करून विद्येची अखंड सेवा करणारे आंबेडकर ,राज्यघटनेच्या ४५ व्या कलमान्वये १४ वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे शिक्षणतज्ञ म्हणजे डॉ.आंबेडकर,मूकनायक,बहिष्कृत भारत,जनता,प्रबुद्ध भारत सारखे समाजमन पेटविणारे वृत्तपत्र चालविणारे एक झुंजार पत्रकार ,जगातील सर्वात मोठ्या संसदीय शासन प्रणालीचे प्रणेते ,एक जहाल अभ्यासू वक्ता , शेकडो वैचारिक पुस्तके लिहणारे एक मर्मभेदि जागतिक दर्जाचा लेखक ,भारतीय जलनीतीचे संकल्पक आणि कुटुंब नियोजनचे प्रवर्तक , शेतकरी-शेतमजूर-कामगारांचे नेते, धार्मिक,सामाजिक , आर्थिक,राजकीय, शैक्षणिक,कृषी,आद्योगिक साहित्यिक क्षेत्रात अत्युच्च कार्य करणारा यशस्वी नेता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर . ही न संपणारी विश्वव्यापी कार्याची यादी आहे.
संपूर्ण भारतीयांसाठी आपले जीवन चंदनासम झिजविणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ६८ व्या महापरिनिर्वाणा निमित्त भावपूर्ण आदरांजली !
मुंबईच्या अरबी समुद्राच्या किनारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी लाखो डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या आणि लाखो विदीर्ण हृदयातून उठणाऱ्या कंपनाच्या साक्षीने पार पडला.चैत्यभूमीला स्पर्श करणाऱ्या अरबी सागराला भावनिक साद घालतांना भीमकवी प्रल्हाद शिंदे लिहतात, - ” अरे सागरा,अरे सागरा ! भीम माझा इथे निजला,शांत हो जरा !! ”
— संकलन व लेखनबाजीराव नवनाथ ढाकणे
बीड जिल्हा समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन,महाराष्ट्र राज्य तथा बीड जिल्हा समन्वयक,लेक लाडकी अभियान ,महाराष्ट्र राज्य
मो – 9421989909
ईमेल – tuljabhawani.ngo@gmail.com
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन